श्रीनगर, दि. 5 - जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात भारतीय जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शनिवारी सकाळी सोपोर जिल्ह्यातील अमरगड येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन एके-47 जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेत एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. जवान व दहशतवाद्यांमधील चकमक आता संपली असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर काश्मीर खो-यात कोणत्याही प्रकारे हिंसाचार उफाळून येऊ नये, या पार्शभूमीवर खबरदारी म्हणून बारामुल्ला परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार
दरम्यान, शुक्रवारी ( 4 ऑगस्ट ) जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी ठार मारला गेला. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला. एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले.
यानंतर एन्काऊंटरमध्ये एका बाईकस्वाराला ठार करण्यात आले. ठार करण्यात आलेला व्यक्ती हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता, असे पोलिसांनी सांगितले. या दहशतवाद्याकडून रायफल, चिनी हॅण्ड ग्रेनेडसहीत अन्य दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत 3 राष्ट्रीय रायफल्सचे एक जवान जखमी झाला आहे. दहशतवादी हल्ल्यात जवान शहीदगुरुवारीदेखील ( 3 ऑगस्ट ) जम्मू काश्मीरमधील शोपियान व कुलगाम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचं नाव आकिब असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर शोपियानमध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यात एक मेजर व दोन जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीननं शोपियान हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. यात अल्ताफ खुचरू सामिल होता, असे वृत्त समोर आले आहे. तो टॉप हिजबुल कमांडर असल्याचे बोलले जात आहे. लष्कर-ए-तोयबाच्या अबू दुजानाचा खात्मामंगळवारी ( 1 ऑगस्ट ) भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबू दुजाना आणि त्याचा साथीदार आरिफचा एन्काऊंटर केला. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जातात.