दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा वाँटेड दहशतवादी बासित दार याच्यासह तीन दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने ठार केले आहे. सोमवारी रात्री सुरू झालेला गोळीबार तब्बल ४० तासांनंतर गुरुवारी सकाळी संपला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांकडून अनेक शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
याबाबत भारतीय लष्कराने ट्विटरवर माहिती दिली. “कुलगाममधील रेडवानी पाइन येथे सुमारे ४० तास संयुक्त ऑपरेशन चालले. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.चिनार कॉर्प्स काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहे, असंही ट्विटमध्ये म्हटले आहे.
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील रेडवानी पाइन भागात सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार गोळीबार झाला. यानंतर भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक बासित दार १८ हून अधिक प्रकरणांमध्ये हवा होता. त्याच्यावर पोलिस आणि निरपराध नागरिकांच्या हत्येसह अल्पसंख्याकांवर हल्ले करण्याचे नियोजन असे गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी, राष्ट्रीय तपास संस्थेने नागरिकांच्या हत्येप्रकरणी बासित दारवर १० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते आणि त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केले होते. त्याच्यावर २०११ मध्ये कुलगाममध्ये दोन बिगर स्थानिक मजुरांच्या हत्येचा आरोप होता.