ऑनलाइन लोकमत -
श्रीनगर, दि. 26 - सीमारेषेवरुन भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणा-या दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले आहे. नौगाव सेक्टरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी 4 दहशतवाद्यांना ठार केलं असून एकाला जिवंत पकडण्यात यश आलं आहे.
'दहशतवाद्याला जिवंत पकडणं आपल्यासाठी खुप मोठं यश आहे. पाकिस्तानचं सत्य यामुळे समोर येईल', असं गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. सर्व दहशतवादी परदेशी नागरिक असल्याची माहिती एका लष्करी अधिका-याने दिली आहे.
जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी हा लाहोरमधील रहिवासी आहे. बहादूर अली असं त्यांचं नाव असल्याचं त्याने सांगितलं आहे. महत्वाची मिळण्याची शक्यता असल्याने चौकशी केली जात आहे. तसेच हे पाचही दहशतवादी हे लश्कर-ए-तोयबाचे सदस्य असल्याचीही माहिती लष्करी सुत्रांकडून मिळाली आहे.