श्रीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्येदहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही तासांत जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दोन चकमकी झाल्या असून, यात एकूण 6 दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांविरोधातील या कारवाईत भारताचा एक जवानही शहीद झाला आहे, तर 9 जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मूतील सुंजवान भागातील चड्ढा कॅम्पजवळ पहाटे 4.15 वाजता हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी ड्युटीवर असलेल्या 15 सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्याला सीआयएसएफने प्रत्युत्तर दिले, त्यानंतर दहशतवादी तेथून पळून गेले. या संपूर्ण कारवाईत एकूण 5 जवान जखमी झाले असून त्यापैकी CISF चा एक ASI शहीद झाला आहे. शहीद झालेल्या जवानाचे नाव एस पटेल आहे.
त्यानंतर शोध मोहीमेदरम्यान सुंजवान भागात चकमक झाली. सकाळी आणखी 5 जवान जखमी झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी UBGL (ग्रेनेड लाँचर) ग्रेनेड फेकले. एडीजीपी जम्मू मुकेश सिंह यांनी सांगितले की, आम्ही रात्रीच्या वेळी परिसराची नाकेबंदी केली होती, आम्हाला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. अजूनही चकमक सुरूच आहे. दहशतवादी कुठल्यातरी घरात असल्याचं दिसतंय. सुंजवान चकमकीत एकूण 2 दहशतवादी ठार झाले आहेत. सध्या गोळीबार थांबला आहे. चकमकीनंतर सुरक्षा दलांना दोन AK47 बंदुका, एक सॅटेलाइट फोन मिळाला आहे. दोन्ही दहशतवादी परदेशी असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन दिवसांनी पंतप्रधान मोदी येणारपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी ही चकमक झाली. पंतप्रधान मोदी रविवारी जम्मूला जाणार आहेत. येथे पीएम मोदी एका मोठ्या रॅलीला संबोधित करतील ज्यात पल्ली गावात हजारो पंचायत सदस्य सहभागी होतील. त्यांच्या दौऱ्याच्या अगोदर येथे हाय अलर्ट ठेवण्यात आला असून सुरक्षा दलांकडून चोवीस तास गस्त घातली जात आहे. कलम 370 आणि 35A द्वारे जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा हटवण्याची पंतप्रधान मोदींची ही पहिलीच राजकीय भेट आहे.
बारामुल्लामध्ये मोठा दहशतवादी मारला गेलायाआधी गुरुवारी संध्याकाळी बारामुल्लामध्ये चकमक झाली होती. यामध्ये आतापर्यंत एकूण 4 दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये लष्कराचा टॉप कमांडर युसूफ कंत्रूही मारला गेला आहे. कंत्रूवर अनेक हत्यांचा आरोप आहे.