ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 5 - चाळीस दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेस 29 जूनपासून प्रारंभ झाला असून गेल्या सहा दिवसांत जवळपास 80,000 यात्रेकरूंनी अमरनाथची यात्रा पूर्ण केली आहे. एका अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, 3,389 यात्रेकरूंचा आणखी एक जत्था कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला आहे. निमलष्करी दलासोबत 102 वाहनांतून हे यात्रेकरू पहाटे 4.05 वाजण्याच्या सुमारास भगवती नगर यात्री निवास स्थानाहून अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत.
अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 3,389 यात्रेकरूपैकी 2,253 यात्रेकरू पहलगाम बेस कॅम्प येथे जाणार आहेत तर 1,136 यात्रेकरू बालटाल बेस कॅम्प येथे जाणार आहेत. तर मंगळवारी 16,00 यात्रेकरूंनी बर्फानी बाबांचे दर्शन घेतले आहे. 7500यात्रेकरूंना गेल्यावर्षी प्रमाणेच दररोज पहलगाम आणि बालटाल मार्गे पवित्र अमरनाथ गुहेकडे रवाना केले जाईल. शिवाय, दोन्ही बेस कॅम्पवर भाविकांसाठी हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अमरनाथची यात्रा 29 जूनला सुरू होऊन 7 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी समाप्त होईल. यंदा झालेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे बाबा बर्फानी (हिम शिवलिंग) आपल्या पूर्ण आकारात दर्शन देतील, असा भक्तांचा विश्वास आहे.
गेल्यावर्षी अमरनाथ यात्रेदरम्यान काश्मीर खोऱ्यात हिंसाचार झाला होता. तथापि, त्याचा अमरनाथ यात्रेकरूंच्या उत्साहावर यावर्षी कोणताही परिणाम झालेला नव्हता. 2016मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हान वानी याचा सुरक्षा दलांनी चकमकीत खात्मा केल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला होता.
प्रशासनाकडून विशेष काळजी
यंदा या यात्रेच्या सुरक्षेसाठी अनेक पदरी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यात्रेकरू आणि वाहनांच्या शोधासाठी सॅटेलाईट ट्रॅकिंग सिस्टीम तैनात करण्यात आली आहे. यात्रा मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, जॅमर्स, बुलेटप्रुफ बंकर्स, श्वान पथके आदी यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या जथ्यालाही सीआरपीएफ जवानांच्या तुकडीचे संरक्षण देण्यात येत आहे.
यात्रेकरूंसाठी देण्यात आलेल्या सूचना
तंदुरुस्ती (मेडिकल फिटनेस) प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही भाविकाला यात्रा करता येणार नाही.
१३ वर्षांहून कमी आणि ७५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना यात्रेसाठी मुभा दिली जाणार नाही.
यात्रेसाठी 50 रुपये एवढे नोंदणी शुल्क आहे.
श्री अमरनाथ विश्वस्त मंडळ यात्रेकरूंचा नि:शुल्क विमा काढणार असून त्यासाठी यात्रेकरूंना ‘अ’ अर्ज भरून द्यावा लागेल.