ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 6 - जम्मू काश्मीरमधून टेरिटोरियल आर्मीचा जवान झहूर ठाकूर AK-47 सहीत फरार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. झहूर ठाकूर हा बारामुला जिल्ह्यातील गांटमुला येथून बेपत्ता झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झहूर ठाकूर 173 टेरिटोरियल आर्मी रेजिमेंटच्या इंजिनिअरिंग विंग येथे तैनात होता. यावेळी झहूरनं लष्करी पथकाला गुंगारा देऊन तो फरार झाल्याचे बोलले जात आहे. ठाकूरची वागणूक संशयास्पद असल्यानं याप्रकरणी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
ठाकूर हा पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचा थांगपत्ता लावण्यासाठी ज्ञात-अज्ञात ठिकाणी, प्रत्येक घराघरात जाऊन सुरक्षा दल चौकशी करत आहेत. पुलवामा जिल्हा हे दहशतवाद्यांचं तळ मानले जाते आणि झहूर ठाकूर हा दहशतवाद्यांसोबत मिळालेला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी काश्मीर खो-यात दहशतवाद्यांकडूनच नाही तर कर्तव्य बजावणा-या व्यक्तींकडूनही पोलीस-जवानांची शस्त्रास्त्रं हिसकावून घेऊन फरार होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. मे महिन्यामध्ये जम्मू काश्मीर पोलिसांच्या चार रायफल घेऊन एक कॉन्स्टेबल फरार झाला होता. या घटनेच्या एका दिवसानंतरच दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीननं असा दावा केला होता की, शस्त्रास्त्रांसहीत फरार झालेला पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या संघटनेसोबत जोडला गेला आहे.
दरम्यान, काश्मीरच्या पुलवामा भागात सुरक्षा दलाने मंगळवारी (4 जुलै ) आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला असून, गेल्या 24 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या चकमकींमध्ये एकूण तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. चकमकीच्या वेळी जवानांनी बामनू परिसरात दहशतवादी लपलेल्या इमारतीलाच उडवल्याचे सांगण्यात आले.
या चकमकीवेळी स्थानिकांनी जवानांवर दगडफेक केली. या वेळी दगडफेक करणारे 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलातर्फे दहशतवाद्यांविरोधात विशेष कारवाई सुरू करण्यात आली. चकमकींमध्ये दोन दहशतवादी मारले गेले होते.
6 पोलिसांना ठार मारणारा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लश्करी ठार
तर गेल्या महिन्यात सहा पोलिसांना ठार मारणारा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर बशीर लश्करी याच्यासह दोन अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी शनिवारी (1 जुलै) काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात एका ऑपरेशनमध्ये ठार मारले.
15 दिवसांतच बदला
बशीर लश्करी हा लष्कर-ए-तोयबाचा खतरनाक अतिरेकी म्हणून ओळखला जात होता. पोलीस अधिकारी फिरोज अहमद डार यांच्यासह सहा पोलिसांना मारणारा अतिरेकी हाच तो बशीर.
जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी त्यावेळीच स्पष्ट केले होते की, शहीद झालेल्या सहा पोलिसांना न्याय मिळवून देऊ. या घटनेला १५ दिवस पूर्ण होत असतानाच शनिवारी सुरक्षा दलाने हे यशस्वी ऑपरेशन करत बशीरचा खात्मा केला. सुरक्षा दलाचे हे यश मानले जाते.
J&K: Territorial Army jawan Zahoor Thakur missing with a AK-47 from his camp in Baramulla"s Gantmulla, Police has begun an investigation. pic.twitter.com/RMg928TNeF— ANI (@ANI_news) July 6, 2017