जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 05:44 AM2024-10-08T05:44:34+5:302024-10-08T05:45:56+5:30

भाजप, काँग्रेस कामगिरीकडे लक्ष

jammu kashmir and haryana assembly election 2024 result today all preparation done for counting of votes | जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

जम्मू/श्रीनगर/चंडीगड : जम्मू-काश्मीर व हरयाणा येथील विधानसभा निवडणुकांची आज, ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर करण्यात येतील. हरयाणामध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता राखू शकेल की, त्या पक्षाचा काँग्रेसकडून पराभव होईल, याबद्दल देशभरात विलक्षण उत्सुकता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांत नेमका कोणाला विजय मिळणार, याकडेही सर्व लोकांचे लक्ष लागले आहे.

हरयाणा, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी ९० जागा आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यात आली. या केंद्रशासित प्रदेशात काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी), भारतीय जनता पक्ष यांच्यातच खरी चुरस आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आज होणाऱ्या मतमोजणीच्या पूर्वतयारीत प्रशासन व्यग्र असून, कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाहीत, यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था राखण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, यंदा जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत पार पडली. पहिल्या टप्प्यात २४. दुसऱ्या टप्प्यात २६ व तिसऱ्या टप्प्यात ४० जागांसाठी मतदान झाले. ८७३ उमेदवारांचे ईव्हीएममध्ये बंद झालेले भवितव्य नेमके काय असेल, याचा उलगडा आज, ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या केंद्रशासित प्रदेशात ६३.४५ टक्के मतदान झाले.

हरयाणात निवडणूक रिंगणात १,०३१ उमेदवार

हरयाणा विधानसभा निवडणुकांत १,०३१ उमेदवार लढत देत होते. त्यामध्ये ४९६ अपक्ष व १०१ महिलांचा समावेश होता. एग्झिट पोलमध्ये हरयाणात काँग्रेसला विजय मिळेल असा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्या राज्यात विधानसभा निवडणुकांत ६७.९० टक्के मतदान झाले.

हरयाणात होणार आमचाच विजय; काँग्रेस, भाजपचा दावा

- हरयाणातील विधानसभा निवडणुकांत आम्हीच जिंकणार, असा भाजप व काँग्रेसला विश्वास आहे. भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता राखणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. 

- आज सकाळी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यावेळी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था राखण्यात येईल असे हरयाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी सांगितले. 

- या राज्यात भाजप, काँग्रेस, आप, आयएनएलडी-एसएसपी, जेजेपी-आझाद समाज पार्टी यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. हरयाणातील अनेक जागांवर भाजप व काँग्रेसमध्येच मुख्य लढत झाली आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

 

Web Title: jammu kashmir and haryana assembly election 2024 result today all preparation done for counting of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.