जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 06:00 AM2024-10-08T06:00:23+5:302024-10-08T06:00:52+5:30

मराठी अधिकाऱ्याच्या नेतृत्वात निकाल; नायब राज्यपाल नियुक्त सदस्य नेमके कुणाचे? आमचेच सरकार येणार; खरगेंचा दावा

jammu kashmir and haryana assembly election result 2024 bjp claims victory | जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा

जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा

जम्मू/श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेच्या ९० जागांसाठी आज, मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू होणार आहे. या निवडणुकीचे निकाल २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेशात पहिले निवडून आलेले सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करेल. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत आहे. 

२०१४ नंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. येथे ९० जागांसाठी ८७३ उमेदवार उभे आहेत. यावेळी ६३.४५ टक्के मतदान झाले असून, ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नोंदवलेल्या ६५.५२ टक्क्यांपेक्षा कमी आहे. केंद्रशासित प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीचा पाठिंबा घेण्यास कोणताही विरोध नसल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

हरयाणात सत्ताधारी भाजपला सलग तिसऱ्यांदा सत्ता टिकविण्याचा विश्वास आहे, तर एक्झिट पोलच्या अंदाजाने प्रोत्साहित झालेले विरोधी पक्षही १० वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याची आशा करत आहेत.  लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातील पहिली मोठी थेट लढत आहे. या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम विजेत्याकडून पुढील काही महिन्यांत निवडणुका होणार असलेल्या इतर राज्यांमध्ये आपल्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी केला जाईल.  निवडणुकीत भाजप, काँग्रेस, आप हे प्रमुख पक्ष आहेत. बहुतांश जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. हरयाणातील ९० जागांसाठी ४६४ अपक्ष आणि १०१ महिलांसह एकूण १,०३१ उमेदवार रिंगणात आहेत. 

मराठी अधिकाऱ्याच्या नेतृत्वात निकाल 

जम्मू आणि काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी पांडुरंग पोळ यांनी रविवारी गांदेरबल पदवी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्राला भेट दिली.  प्रोटोकॉलचे पालन करून मतमोजणी करण्याचे आश्वासन दिले. 

नायब राज्यपाल नियुक्त सदस्य नेमके कुणाचे?

जम्मू : जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेत जनादेश येण्यापूर्वीच नायब राज्यपालांनी पाच सदस्य नियुक्त करून ते विधानसभेत पाठविण्याची तयारी सुरू केली आहे.  त्यामुळे हे सदस्य येथील सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र, या नामनिर्देशनाला काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स,  पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांनी ठाम विरोध केला असून, त्यांनी  सर्वोच्च न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे. पाच आमदारांना नामनिर्देशित करण्यास काँग्रेसने आधीच तीव्र विरोध दर्शविला आहे आणि अशा कोणत्याही हालचालीला लोकशाही आणि संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. पाच सदस्यांना नामनिर्देशित केल्यास, विधानसभेतील संख्या ९५ पर्यंत वाढेल. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ४८ जागांपर्यंत वाढेल.

प्रमुख उमेवार

- मुख्यमंत्री सैनी (लाडवा)
- विरोधी पक्षनेते हुड्डा 
(गढी सांपला-किलोई)
- इनेलोचे अभय चौटाला (ऐलनाबाद)
- जजपाचे दुष्यंत चौटाला (उचाना कलां)
- भाजपचे अनिल विज 
(अंबाला कँट)
- ओपी धनखर (बादली)
- आपचे अनुराग ढांडा (कलायत) 
- काँग्रेसच्या विनेश फोगट (जुलाना) 

आमचेच सरकार येणार : खरगेंचा दावा

बंगळुरू : हरयाणामध्ये काँग्रेस, जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी सत्तेवर येईल, अशी खात्री असल्याचे काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सांगितले. दोन्ही राज्यांत निवडणुकांची उद्या मतमोजणी आहे.

काँग्रेस नेत्यांनाच विचारा

- कर्नाटकातील जात सर्वेक्षणाचा अहवाल मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री परमेश्वर यांनी केली होती. 

- अहवालाची अंमलबजावणी कधी करण्याबाबत काँग्रेस नेत्यांकडे विचारणा करावी, असे खरगे म्हणाले. 

मी न थकलेला आहे, ना रिटायर्ड आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेईल तो सर्वपक्षीय नेते मान्य करतील. लोकसभा निवडणुकीत सर्व १० जागांवर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली आहे आणि भाजपची मते कमी झाली आहेत. यामुळे हरयाणात यावेळी काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. - भूपेंद्र सिंह हुड्डा, माजी मुख्यमंत्री
 

Web Title: jammu kashmir and haryana assembly election result 2024 bjp claims victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.