श्रीनगर - लष्कर जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. जम्मू काश्मीरमधील लितर गावात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासूनच चकमक सुरु होती. यावेळी काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत कारवाईला सुरुवात केली. लष्कर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली होती. लष्कराने दहशतवाद्यांना चोख उत्तर देत ठार केलं आहे. वसीम शाह आणि हाफिज निसार अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. दोघे दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे होते. त्यांच्याकडून एके-47, एके -56 आणि सहा एके मॅगझिन जप्त करण्यात आल्या आहेत.
याआधी काश्मिरात विमानतळाजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा कमांडर खालीद ऊर्फ शाहीद शौकत याला सुरक्षा दलाने सोमवारी एका चकमकीत ठार मारले. याशिवाय शोपियात झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. बारामुल्ला जिल्ह्याच्या लादुरा भागात अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागाला घेरण्यात आले. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांच्या दिशेने गोळी चालविण्यात आल्यानंतर चकमक सुरू झाली. यावेळी जैश-ए-मोहम्मदचा अतिरेकी खालीद हा ठार झाला. शोपिया जिल्ह्यात केल्लर भागात सुरक्षा दलाने एका चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तीन अतिरेक्यांना ठार मारले. यात हिज्बुलचा म्होरक्या जाहीदसह इरफान आणि आसिफ यांचा समावेश आहे.
रोज होतो पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्माभारतीय जवान रोज पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केला. पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या, असे आदेश त्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आपण स्वत:हून पाकिस्तानच्या दिशेने गोळीबार करायचा नाही, मात्र तेथून गोळीबार झाला, तर त्यांना जोरात प्रत्युत्तर द्यायचे, असे जवानांना आदेश आहेत.