जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर आता पाच वर्षांनी या राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. दरम्यान, काश्मीरमधील प्रमुख पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फ्ररन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी मोठं विधान केलं आहे. जम्मू काश्मीरमधील विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात प्रस्ताव पारित केला जाईल, असं विधान उमर अब्दुल्ला यांनी केलं.
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभा आपल्या पहिल्या कामाच्या रूपामध्ये या भागाला राज्य म्हणून असलेला दर्जा आणि विशेष राज्याचा दर्जा हिरावणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात प्रस्ताव पारित करेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक घेण्याची घोषणा केल्यानंतर उमर अब्दुल्ला यांनी हे विधान केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ४ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याआधी २०१४ मध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती. तसेच निवडणुकीनंतर भाजपा आणि पीडीपी यांनी आघाडी सरकार स्थापन केलं होतं. हे सरकार कोसळल्यानंतप १९ डिसेंबर २०१८ पासून काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे.
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर उमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल होईपर्यंत निवडणुकीत सहभागी होण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांचे वडील आणि नॅशनल कॉन्फ्रन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला हे विधानसभा निवडणुकीत पक्षाचं नेतृत्व करणार आहेत.