Jammu Kashmir Assembly Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त असून उमेदवारांची घोषणाही करत आहेत.
काँग्रेसपाठोपाठ आता भाजपनेही आपल्या बड्या नेत्यांना येथे निवडणूक प्रचारात उतरवण्याची योजना आखली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह उद्या म्हणजेच शुक्रवारी (दि.६) जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी अमित शाह जम्मूमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर ते आरएसएस आणि भाजप नेत्यांची बैठक घेणार आहेत. अमित शाह शनिवारी जम्मूमध्ये रॅलीही घेऊ शकतात.
दरम्यान, अमित शाह यांचा हा जम्मू दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जम्मूमध्ये तिकीट वाटपावरून पक्षांतर्गत जोरदार खडाजंगी सुरू आहे. अनेक बड्या नेत्यांनी तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन पक्ष सोडला आहे. अनेक विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून निदर्शने केजी जात आहेत. अशा स्थितीत अमित शाह या दौऱ्यात स्थानिक नेत्यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू शकतात, असे म्हटले जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये स्टार प्रचार लवकरच प्रचार सुरू करतीलभाजपने गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये ४० नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व नेत्यांचा लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक प्रचार सुरू होणार आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांच्या काही मुख्यमंत्र्यांचाही या यादीत समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांमध्ये मनोहर लाल खट्टर, जी किशन रेड्डी, शिवराज सिंह चौहान आणि डॉ जितेंद्र सिंह अशी नावे आहेत.