Congress MP Rahul Gandhi News: विविध विषयांवरून केवळ राज्यातील नाही, तर देशातील वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुमारे १० वर्षांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी काही पक्षांनी उमेदवार यादीही जाहीर केली आहे. भाजपाच्या यादीवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले, तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात जागावाटपावरून मतभेद होत असल्याची चर्चा आहे. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला, याबाबत सांगितले.
राहुल गांधी सध्या काश्मीर दौऱ्यावर असून श्रीनगरमध्ये त्यांनी काही महाविद्यालयीन युवतींशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. शिक्षणाचा संदर्भ देताना राहुल गांधी म्हणाले की, माझा राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याबाबतचा अनुभव असा आहे की, जे ते तुम्हाला विद्यापीठांमध्ये शिकवतात, त्याचा वास्तव राजकारणाशी काहीही संबंध नसतो. ते कुठल्यातरी वेगळ्या जगातील शिक्षण असते आणि वास्तव राजकारण वेगळ्याच विश्वात घडत असते, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
राजकारणात येण्याचा निर्णय कधी घेतला? राहुल गांधींनी सांगितली ‘ती’ घटना
लहानपणापासूनच राजकारणात येण्याचा विचार केला होता का? असे राहुल गांधींना विचारण्यात आले. लहानपणापासून राजकारणात येण्याचा काही विचार नव्हता. तसे काही ठरवले नव्हते. पण जेव्हा बाबांचे निधन झाले, तेव्हा वाटले की राजकारणात यायला हवे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर वाटले की त्यांना जे करायचे होते, ते करण्यापासून कुणीतरी त्यांना थांबवले. मग राजकारणात येण्याचा विचार केला. तुम्हाला समोर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टी बदलण्यासाठी आधी स्वत:ला बदलावे लागते, असे राहुल गांधींनी नमूद केले.
दरम्यान, यावेळी राहुल गांधींना लग्न करण्याबाबत विचारले गेले. तेव्हा, लग्नाचा दबाव? मी गेल्या २०-३० वर्षांपासून लग्नाचे दडपण लांब ठेवण्यात यशस्वी ठरलो आहे. पण मला वाटतं ती एक चांगली गोष्ट आहे. यापुढे आता लग्न करण्याचा विचार आहे का, या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, हो. म्हणजे त्यासाठी काही वेगळे नियोजन करत नाही. पण जर ते घडले तर ती एक चांगली गोष्ट आहे.