कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत देशभरात उत्सुकता आहे. दरम्यान, तीन टप्प्यात झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. इंडिया टुडे- सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल काँफ्रन्स यांची इंडिया आघाडी सर्वात मोठी आघाडी ठरण्याची शक्यता आहे. तर भाजपाला दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागणार आहे.
इंडिया टुडे आणि सी-वोटरच्या आकडेवारीनुसार विधानसभेच्या ९० जागा असलेल्या जम्मू-काश्मीरच्या विधानसभेमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स-काँग्रेस आघाडीला ४० ते ४८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपाला २७ ते ३२ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. त्याशिवाय पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाला ६ ते १२ तर इतर आणि अपक्षांना ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे.
या एक्झिट पोलच्या सविस्तर आकडेवारीनुसार जम्मू विभागामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. जम्मूमधील विधानसभेच्या ४३ जागांपैकी भाजपाला २७ ते ३१, काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्स आघाडीला ११ ते १५, पीडीपीला ० ते २ आणि इतरांना ० ते १ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काश्मीर विभागातील ४७ जागांपैकी काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्स आघाडीला २९ ते ३३, तर पीडीपीला ६ ते १० आणि इतरांना ६ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काश्मिरमध्ये भाजपाला ० ते १ जागा मिळू शकते, असा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.