तब्बल दहा वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्सच्या आघाडीने ४९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर भाजपाला २९ जागांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, आता येथील निवडणुकीच्या निकालाची वेगवेगळी आकडेवारी समोर येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये आता ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. मात्र सत्ताधारी काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्सकडून केवळ २ हिंदू उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार विजयी होऊ शकलेला नाही.
राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्स यांच्या आघाडीने हिंदू आणि शीख समाजामधील ३० उमेदवार दिले होते. त्यामधील केवळ २ उमेदवार विजयी झाले. हे दोन्ही उमेदवार नॅशनल कॉन्फ्रन्स पक्षाचे होते. नॅशनल कॉन्फ्रन्सने एका महिला उमेदवारासह एकूण ९ हिंदू उमेदवार दिले होते. त्यातील दोघे विजयी झाले. तर काँग्रेसने १९ हिंदू आणि २ शीख उमेदवारांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी बहुतांश जम्मू विभागामध्ये होते. मात्र काँग्रेसने दिलेल्या हिंदू आणि शीख उमेदवारांपैकी कुणीही विजयी होऊ शकला नाही.
नॅशनल कॉन्फ्रन्सच्या विजयी झालेल्या दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार असलेल्या सुरिंदर चौधरी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांना पराभूत केले. नौशेरा विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या या लढतीत सुरिंदर चौधरी यांनी रैना यांना ७ हजार ८१९ मतांनी पराभूत केले. २०१४ मध्ये सुरिंदर चौधरी पीडीपीकडून लढले होते. तेव्हा त्यांना रैना यांनी पराभूत केले होते. पुढे सुरिंदर चौधरी भाजपामध्ये गेले होते. तर मागच्या वर्षी त्यांनी नॅशनल कॉन्फ्रन्स पक्षात प्रवेश केला होता.
तर नॅशनल कॉन्फ्रन्सच्या अर्जुन सिंह राजू यांनी रामबन विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या भाजपाच्या सूरज सिंह परिहार यांचा पराभव केला. येथे भाजपाचा अधिकृत उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये भाजपाचे २९ उमेदवार विजयी झाले. हे सर्व उमेदवार जम्मू विभागातून विजयी झाले. भाजपाने जम्मू काश्मीरमध्ये २५ मुस्लिम उमेदवारांनाही उमेदवारी दिली होती. मात्र त्यापैकी कुणीही विजयी होऊ शकला नाही. त्यातही काश्मीर खोऱ्यात भाजपाच्या बहुतांश उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं. भाजपाच्या विजयी झालेल्या २९ उमेदवारांपैकी २८ हिंदू तर एक शीख आहे.