Jammu And Kashmir Assembly Election 2024: तब्बल १० वर्षांनंतर जम्मू आणि काश्मीर येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर, अनुच्छेद ३७० हटवल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, निवडणूक काश्मीरमध्ये असली, तरी दिल्लीत मतदान करण्याची विशेष सुविधा काही जणांना देता येते. असे का केले जाते, कोणाला ही विशेष सुविधा मिळते, अशी सुविधा का सुरू करण्यात आली, ते जाणून घेऊया...
जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत ८८.६६ लाख मतदार नेते निवडणार आहेत. परंतु, काश्मीरमध्ये निवडणूक असली, तरी काश्मिरी पंडितांना दिल्लीत मतदान करण्याची विशेष सुविधा देण्यात आली आहे. काश्मीरी प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावू शकतात. ०१ नोव्हेंबर १९८९ नंतर काश्मीर खोऱ्यातून निघून गेलेल्या आणि निर्वासित झालेल्यांचे नाव रिलीफ कमिशन यादीत नोंदवले गेले. यामध्ये काश्मिरी पंडितांची संख्या मोठी आहे, असे सांगितले जाते. यामध्ये काश्मिरी प्रवासी लोकांच्या संख्या जवळपास सव्वा लाखाच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे.
विधानसभा, लोकसभा निवडणुकीत यंत्रणा
कश्मीर खोऱ्यातून निघून गेलेले अधिकतर प्रवासी जम्मू, उधमपूर आणि दिल्लीत स्थायिक झाले. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील निवडणूक असली की, काश्मिरी प्रवासींसाठी जम्मू, उधमपूर आणि दिल्ली येथे विशेष बुथ तयार केले जातात. काश्मिरी पंडित आणि काश्मिरी प्रवासी या बुथवर जाऊन मतदान करून शकतात. १९९६ मध्ये जम्मू काश्मीर येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ही यंत्रणा राबवली गेली होती. यानंतर प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी ही यंत्रणा कायम ठेवण्यात आली होती. केवळ जम्मू काश्मीर येथील काश्मिरी प्रवासी असलेल्यांसाठी ही सोय करण्यात आली आहे. बाकी देशभरातली कोणत्याही प्रवासी निर्वासितांसाठी ही सुविधा उपलब्ध नाही.
या मतदार केंद्रात जाऊन मतदानाचा हक्का बजावला जाऊ शकतो
पिपल्स ऑफ रिप्रेझेंटेन कायदा १९५१ चे कलम २० अ प्रमाणे, ज्या विधानसभा मतदारसंघात नाव नोंदणी असेल, तिथेच जाऊन मतदान करावे लागते. या नियमामुळे घरे सोडून दुसरीकडे गेलेल्या निर्वासितांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. अशा व्यक्ती मतदान करू शकत नाहीत. काश्मीर खोऱ्यातून निर्वासित झालेल्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जम्मू, उधमपूर आणि दिल्लीत विशेष मतदान केंद्र सुरू केले जाते. या मतदार केंद्रात जाऊन मतदानाचा हक्का बजावला जाऊ शकतो.
कशी असते ही प्रक्रिया?
१९९० मध्ये काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर दहशतवाद फोफावला होता. त्यामुळे हजारो काश्मिरी पंडितांना आपापली घरे सोडून निर्वासित व्हावे लागले होते. काश्मीर खोऱ्यातून निर्वासित झालेले काश्मिरी पंडित तसेच अन्य लोक जम्मू, उधमपूर, दिल्लीसह देशातील अनेक भागात स्थिरावले. त्यावेळेस काश्मिरी प्रवासी कुटुंबांची संख्या ४४ हजारांवर होती, त्यात १.५४ लाखांहून अधिक लोकांचा समावेश होता, अशी माहिती सरकारने दोन वर्षांपूर्वी संसदेत एका उत्तरात दिली होती. अशा काश्मिरी प्रवासी किंवा काश्मिरी पंडितांना एक फॉर्म-एम भरून द्यावा लागतो. त्यानंतरच विशेष मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करता येते. ही प्रक्रिया केली नाही, तर मतदान करता येत नाही, असे सांगितले जाते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकांसाठी लवकरच यादी जाहीर होणार
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी जम्मू आणि उधमपूर येथील प्रवासी काश्मिरींसाठी फॉर्म-एम भरण्याची आवश्यक अट शिथील करण्यात आली होती. परंतु, दिल्लीतील अशा नागरिकांसाठी ती अट अनिवार्य होती. यंदाच्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांसाठी काश्मिरी प्रवासी मतदारांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा बदल किंवा सुधारणा करण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला जाणार आहे. यानंतर यादी अंतिम केली जाणार आहे.