श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये CRPF च्या ताफ्याजवळ शनिवारी (30 मार्च) एका कारमध्ये स्फोट झाला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर बनिहाल येथे हा स्फोट झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा तेथून जात असताना कारमध्ये स्फोट झाला. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. मिळालेल्या माहितीनुसार, सँट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कोणीही जखमी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचं नुकसान झाले आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.
सीआरपीएफ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) ताफा जात असताना कारमध्ये स्फोट झाला. जवळपास बसमध्ये 40 जवान होते. कारने सीआरपीएफच्या एका बसला जोरदार धडक दिली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आहे. प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचं दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. सुरक्षादलाकडून या भागात शोधमोहिम सुरू आहे. पोलिसांकडून स्फोटानंतर फरार झालेल्या कार चालकाचा शोध सुरू आहे.
भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी काही दिवसांपूर्वीच पुलवामा हल्ल्यासारखी घटना घडू शकते, असा अलर्ट दिला होता. जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं 14 फेब्रुवारीला भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. यापुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली होती. 14 फेब्रुवारीला श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपूरा भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला होता. अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. दहशतवाद्यांनी हायवेवर गाडीमध्ये आयईडी (Improvised Explosive Device) स्फोटकं भरुन त्यात हा स्फोट घडवून आणला. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आला होता. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.