श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टर परिसरात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानानं केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे. बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. सोमवारी (14 मे) रात्री जवळपास 11.30 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून सीमारेषेवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय सैन्यादेखील सडेतोड प्रत्युत्तरदेखील दिले. दोन्ही दिशेनं जवळपास एक तास गोळीबार सुरू होता. यादरम्यान, बीएसएफचे जवान देवेंद्र सिंह जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, जवळपास 24 तासांपूर्वी बीएसएफला कठुआ जिल्ह्याजवळील हीरानगर सेक्टर परिसरात आंतरराष्ट्रीय सीमेवर 5 संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली आढळून आल्या होत्या. हे पाचही जण दहशतवादी होते व ते घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर भारतीय सैन्यानं परिसरात हाय अलर्ट जारी करुन शोध मोहीम सुरू केली.