श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जवानांनी दोन दहशतवाद्यांचा कंठस्नान घातले आहे. यामध्ये दोन जवानदेखील जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी बडगाममधील कठपोरा परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनानं परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे.
(Jammu Kashmir : कुलगाममध्ये चकमकीदरम्यान एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांचा खात्मा)
दरम्यान, गेल्या 2 आठवड्यांमध्ये जवानांनी 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडराचाही समावेश आहे.
काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा
दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात शनिवारी (24 नोव्हेंबर) मध्यरात्री सुरू होऊन रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिलेल्या सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. संशयित दहशतवादी म्हणून मारल्या गेलेल्या सहांपैकी पाच जण स्थानिक युवक होते. सहावा पाकिस्तानी नागरिक असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लगोलग करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.