काश्मीरच्या बडगाममध्ये मोठा अपघात झाला आहे. निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेली एक बस जिल्ह्यातील वाटरहॉल भागात दरीत कोसळली. या अपघातात बीएसएफचे अनेक जवान जखमी झाले आहेत. बीएसएफच्या 35 जवानांना घेऊन जात असताना बस एका कड्यावरून घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातात बसचेही मोठे नुकसान झाले आहे. येथील ब्रेल गावातील नाल्यात ही बस कोसळली आहे.
बस अपघातात चार जवानांचा मृत्यू -बीएसएफच्या पीआरओने अपघातात बीएसएफच्या तीन जवानांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. अपघातस्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना खानसाहीब आणि बडगाम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथून दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी बडगामकडे येत असताना हा अपघात झाला.
25 सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील 26 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. बसमधील 35 जवानांपैकी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस खान साहिब वाटरहॉल पोलीस चौकीवर जात होती. मात्र साधारणपणे 5 वाजण्याच्या सुमारास पोलीस चौकीपासून केवळ 600 मीटर दूर असतानाच हा अपघात झाला.
यापूर्वीही जम्मू भागातील राजौरी येथे जवानांच्या वाहनाला अपघात झाला होता. बुधवारी (18 सप्टेंबर, 2024) मांजकोट परिसरात जवानांचे वाहन 400 फूट खोल दरीत कोसळले. बुलेट प्रूफ वाहनात पॅरा-2 युनिटचे जवान बसलेले होते. यात सहा कमांडो जखमी झाले होते. तर एका लान्स नायकाच मृत्यू झाला होता.