जम्मू-काश्मीरपोलिसांसह भारतीय लष्कराच्या जवानांना NH-४४ वर मोठा अपघात टाळण्यात यश मिळालं आहे. अमरनाथहून पंजाबमधील होशियारपूरला जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे अनेक लोक प्रवास करत असलेल्या बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं. जवानांनी अतिशय हुशारीने वाहनावर नियंत्रण ठेवल्याने मोठी दुर्घटना टळली.
जम्मू-काश्मीरपोलिसांसह भारतीय लष्कराच्या जवानांनी बसचा वेग कमी केला. बसचा वेग जास्त असताना त्यांनी टायरखाली दगड ठेऊन वाहनावर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, त्यात त्यांना यश आलं. बऱ्याच प्रयत्नांनंतर अखेर बसवर नियंत्रण मिळवून नाल्यात पडण्यापासून वाचवण्यात आली.
बसमध्ये ४० प्रवासी होते, ज्यांना धक्का बसल्याचं सांगण्यात येत आहे. बसचे ब्रेक फेल झाल्यानंतर अनेक लोक बसच्या आतमध्ये धावू लागले, त्यामुळे अनेक जण जखमीही झाले. जखमींमध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बसमध्ये ४० यात्रेकरू होते जे पंजाबमधील होशियारपूरला परतत होते. बनिहालजवळील नचलाना येथे पोहोचल्यानंतर ब्रेक फेल झाल्यामुळे चालक बस थांबवू शकला नाही. लष्कराच्या क्विक रिॲक्शन टीमने रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना मदत केल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमींना नचलाना येथे वैद्यकीय मदत देण्यात आली. काही जणांना गंभीर दुखापतही झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.