श्रीनगर: कलम 370 हटवण्यात आल्यामुळे काश्मीर खोऱ्यात ईदचा उत्सव कसा साजरा केला जाईल अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच याच पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र काश्मीरमध्ये सर्वत्र ईद शांततापूर्ण वातावरणात झाल्याचे जम्मू- काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी सांगितले.
त्यातच आज( सोमवारी) जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणेकडून गोळीबार करण्यात आल्याने त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र जम्मू- काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी काश्मीर खोऱ्यात बकरी ईद अगदी शांततापूर्ण वातावरणात साजरी झाली असून अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले.
जम्मू- काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. तसेच यानंतर लोकसभेत कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले होते. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय मानला जात आहे.