J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 07:38 PM2024-10-08T19:38:37+5:302024-10-08T19:39:29+5:30

दहशतवादी अफजल गुरुच्या भावाला दणका, मिळाली फक्त 129 मते; नोटापेक्षाही कमी

Jammu-Kashmir Election 2024 AIP, Jamaat-e-Islami rejected by voters in J&K | J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले

J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले


Jammu-Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. दहा वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी फुटीरतावादी उमेदवारांना पूर्णपणे नाकारले आहे. इंजीनिअर राशीद याच्या अवामी इत्तेहाद पार्टी (एआयपी) आणि जमात-ए-इस्लामी सारख्या पक्षांना मतदारांनी मोठा दणका दिला. या पक्षांचे बहुतांश उमेदवार निवडणुकीत आपली अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत. यावरुनच मतदारांनी त्यांना पूर्णपणे नाकारल्याचे स्पष्ट होते.

मात्र, इंजिनीअर राशीद यांचे बंधू खुर्शीद अहमद शेख, लंगेट मतदारसंघातून विजयी झाले. हा यंदाच्या निवडणुकीतील एकमेव मोठा विजय म्हणता येईल. याशिवाय, कुलगाममधून जमात-ए-इस्लामी समर्थित उमेदवार सय्यर अहमद रेशी यांनीदेखील विजय मिळवला. या दोघांशिवाय इतर सर्व उमेदवारांना जनतेचा पाठिंबा मिळाला नाही.

अफझल गुरुच्या भावाचा दारुण पराभव
भारताने फासावर चढवलेला दहशतवादी अफझल गुरुचा भाऊ एजाज अहमद गुरू याचाही सोपोरमधून मोठा पराभव झाला. एजाजला फक्त 129 मते मिळाली. या जागेवरुन 'नोटा'ला त्यांच्यापेक्षा 341 मते जास्त मिळाली.

अवामी इत्तेहाद पक्षाची वाईट अवस्था

इंजीनिअर रशीद यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाने (एआयपी) 44 उमेदवार उभे केले होते, परंतु त्यापैकी अनेकांना त्यांची अनामत रक्कमही वाचवता आली नाही. एआयपीचे प्रवक्ते फिरदौस बाबा आणि व्यापारी शेख आशिक हुसेन यांसारखे प्रमुख उमेदवारही पराभूत झाले. शेख आशिक यांना केवळ 963 मते मिळाली, तर 'नोटा'ला 1,713 मते मिळाली. यावरून जनतेने या पक्षाला पूर्णपणे नाकारल्याचे दिसून येते.

फुटीरतावादी राजकारणाला धक्का
काश्मीरमधील जनता आता फुटीरतावादी राजकारणाला नाकारत असल्याचे या निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले आहे. हे निवडणूक निकाल म्हणजे काश्मीरच्या राजकीय दिशेने मोठ्या बदलाचे संकेत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळालेली नॅशनल कॉन्फरन्स आपल्या आश्वासनांची पूर्तता कशी करते, याकडे आता सर्वांचे लक्ष असेल. 

निकाल
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. निकालात NC-काँग्रेसचा विजय झाला असून या आघाडीने सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. निवडणुकीत एनसी-काँग्रेसला 49, भाजपला 29, पीडीपीला 3 आणि इतरांना 9 जागा मिळाल्या.
 

Web Title: Jammu-Kashmir Election 2024 AIP, Jamaat-e-Islami rejected by voters in J&K

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.