Jammu-Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणुका झाल्या अन् राज्यात नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. आज या नवीन सरकारचा शपथविधी सोहळाही पार पडला. ओमर अब्दुल्ला यांनी आज मुख्यमंत्रीपदाची, तर त्यांच्याच पक्षाच्या इतर पाच आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे, काँग्रेसच्या एकाही आमदाराला मंत्री बनवण्यात आले नाही. याचे कारण म्हणजे, काँग्रेसने ओमर सरकारला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला आहे.
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने एकत्रित विधानसभा निवडणूक लढवली होती. दुर्दैवाने यात काँग्रेसला मोठे अपयश आले. पक्षाचे फक्त सहा आमदार विजयी झाले. तर, एनसीने 42 जागा मिळवल्या. दरम्यान, आता काँग्रेसने सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकार येऊनही काँग्रेस सत्तेत का सामील झाली नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काँग्रेसच्या या निर्णयामागे 4 मोठी कारणे आहेत...
1. जम्मू-काश्मीरच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली. पक्षाला फक्त 6 जागा जिंकता आल्या. अशा परिस्थितीत पक्षाच्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश न करून काँग्रेस हायकमांडने नेत्यांना जमिनीवर काम करण्याचा संदेश दिल्याचे बोलले जात आहे.
2. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून एकही हिंदू आमदार विजयी झालेला नाही. अशा स्थितीत पक्षाची राजकीय समीकरणे जुळत नव्हती. काश्मीरची मुस्लिम व्होट बँक पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या बाजूने गेली आहे.
3. ओमर अब्दुल्ला आणि त्यांचा पक्ष कलम 370 परत आणण्याच्या बाजूने आहे. काँग्रेस फक्त राज्याचा दर्जा मागत आहे. जर पक्ष सरकारमध्ये सामील झाला असता, तर इतर राज्यांमध्ये राजकीय उलथापालथ झाली असती, त्यामुळे पक्षाने सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
4. नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेसला 1-2 मंत्रीपदांची ऑफर दिली होती. दिल्लीत बसलेल्या काँग्रेस नेत्यांना प्रतिकात्मक सहभाग नको होता.
पक्षाचे 6 आमदार विजयी झाले, त्यापैकी 3 दिग्गजकाँग्रेसने खोऱ्यात 37 उमेदवार उभे केले होते, पण जम्मू आणि चिनाब भागात पक्षाचा पूर्णपणे सुपडा साफ झाला. यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसचे फक्त 6 आमदार विजयी झाले आहेत. यामध्ये पिरजादा मोहम्मद सईद, तारिक हमीद कारा, गुलाम अहमद मीर या दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. करारा हे खोऱ्यातील काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर, काँग्रेसने गुलाम अहमद मीर यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे.