Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. कलम 370 हटवल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद होऊ शकतो. ''अब्दुल्ला कुटुंबाने जर पाकिस्तानचा अजेंडा पाळला असता, तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग झाला असता'', असे मेहबुबा यांनी म्हटले आहे.
...तर आम्ही पाकिस्तानात असतोश्रीनगरमध्ये एका सभेत पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताने काश्मीरमधील अब्दुल्ला कुटुंबाचे आभार मानले पाहिजेत. मुस्लिम बहुसंख्य असूनही शेख अब्दुल्ला यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. अन्यथा आज आम्ही स्वतंत्र झालो असतो किंवा पाकिस्तानसोबत गेलो असतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे जम्मू-काश्मीरचे देशात विलीनीकरण झाले,'' असे वक्तव्य मेहबूबा यांनी केले आहे.
सरकार स्थापनेसाठी भाजप पीडीपीच्या दारात आलीमेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या, ''काश्मीरमध्ये जेव्हा दहशतवाद शिगेला पोहोचला होता, तेव्हा मुफ्ती कुटुंबाने काश्मीरमध्ये हुर्रियतशी करुन तरुणांना हिंसाचारापासून दूर ठेवले. पंतप्रधान मोदींना हे लक्षात असेल की, ते सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या दारात आले होते. आम्ही कितीही अटी घातल्या तरी ते आमच्यासोबत सरकार स्थापन करण्यास तयार होते. आम्ही 370 शी छेडछाड केली जाणार नाही, अशाप्रकारच्या अटी घातल्या होत्या. याशिवाय, राज्यातील अनेक रस्ते खुले होतील, AFSPA हटवला जाईल, पाकिस्तान आणि फुटीरतावाद्यांशी चर्चा केली जाईल...या सर्व अटी मान्य करुन ते आमच्यासोबत आले होते,'' असा खुलासाही त्यांनी यावेळी केली.