Jammu-Kashmir Election Result 2024 : आज जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. हरयाणामध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा एकहाती सत्ता खेचून आणली, तर जम्मू-काश्मीरमध्येही दमदार कामगिरी केली. राज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने 49 तर भाजपने 29 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, इतर पक्ष+ अपक्षांना 12 जागा मिळाल्या. यादरम्यान, मुस्लिमबहुल मतदारसंघ असलेल्या किश्तवाडची चर्चा होत आहे.
जम्मू-काश्मीरमधील बहुतांश मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा पराभव झाला, पण किश्तवाडमध्ये भाजपने विजय मिळवला. या मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजप उमेदवार शगुन परिहार विजयी झाल्या आहेत. हा विजय भाजपसाठी खुप महत्त्वाचा आहे, कारण या मतदारसंघात मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे येथून हिंदू उमेदवाराचा विजय होणे, भाजपसाठी महत्त्वाचे आहे.
सज्जाद अहमद किचलूचा पराभव किश्तवाडमधून 29 वर्षीय भाजप उमेदवार शगुन परिहार हिने नॅशनल कॉन्फरन्सचे सज्जाद अहमद किचलू यांचा 521 मतांनी पराभव केला. किश्तवाड ही मुस्लिम बहुसंख्य जागा आहे, जिथे 70% पेक्षा जास्त लोकसंख्या मुस्लिम आहे. शगुनला 29053 मते मिळाली, तर किचलू यांना 28532 मते मिळाली. शगुनने आपल्या विजयाबद्दल तेथील जनतेचे आभार मानले आणि हा विजय केवळ तिचाच नाही, तर जम्मू-काश्मीरच्या जनतेचा विजय असल्याचे म्हटले.
वडील आणि काकाची हत्याशगुन परिहारचे वडील अजित परिहार आणि काका अनिल परिहार हे भाजपचे राज्यातील दिग्गत नेते होते. 2018 मध्ये या दोघांचीही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. पीएम मोदींनी डोडा येथील रॅलीमध्येही याचा उल्लेख केला होता. शगुन परिहारच्या वडील आणि काकांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. आम्ही तिला उमेदवारी दिली, हे दहशतवाद संपवण्याच्या भाजपच्या संकल्पाचे जिवंत उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया पीएम मोदींनी दिली होती.