जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. येथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाने (आप) डोडा विधानसभेच्या निकालाने धक्का दिला आहे. डोडा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या आपने विजय मिळवला आहे. आपने आपल्या एक्सवर पोस्ट करत या मतदारसंघातील उमेदवाराचे अभिनंदन केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये झाडू चालला. डोडा विधानसभेतील पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांनी विजय मिळवल्याबद्दल देशभरातील आपच्या कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे अभिनंदन, असे आपने ट्विटद्वारे म्हटले आहे.
डोडा विधानसभेतून आपचे उमेदवार मेहराज मलिक चार हजारहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांनीही मेहराज मलिक यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी एक्सवर मेहराज मलिक यांचे अभिनंदन करणारी पोस्ट केली आहे. दोडा येथील आपचे उमेदवार मेहराज मलिक यांनी भाजपचा पराभव करून नेत्रदीपक विजय मिळविल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही निवडणूक चांगली लढवली. पाचव्या राज्यात आमदार झाल्याबद्दल संपूर्ण आपचे अभिनंदन, असे अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कोण आहेत मेहराज मलिक?मेहराज मलिक हे डोडा भागातील अतिशय लोकप्रिय नेते आहेत. आपल्या नम्र पार्श्वभूमीमुळे आणि लोकांशी जोडले गेल्यामुळे त्यांनी डोडामध्ये गेल्या काही वर्षांत एक मजबूत जनाधार तयार केला आहे. मात्र, मेहराज मलिक यांचा विजय हा मोठा उसफेर मानला जात आहे, कारण डोडा हा प्रदेश परंपरागतपणे मुख्य प्रवाहातील पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. भ्रष्टाचाराशी लढा, सुशासन आणि जनतेची सेवा करण्यावर मेहराज मलिक यांचा भर असल्यामुळे त्यांना स्थानिक मतदारांचा पाठिंबा मिळाला.
मेहराज मलिक यांना २२९४४ मतं निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मेहराज मलिक यांना २२९४४ मतं मिळाली असून ते भाजपच्या गजयसिंह राणा यांच्यापेक्षा १७७० मतांनी आघाडीवर आहेत. गजयसिंह राणा यांना १८१७४ मते मिळाली आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे खालिद नजीब सुहरवर्दी ९९६९ मतांनी पिछाडीवर आहेत. नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस युती ९० जागांच्या जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीत आघाडीवर आहे आणि निवडणूक आयोगाच्या मते, युती ४८ जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाने नऊ जागांचे निकाल जाहीर केले आहेत, त्यापैकी गुरेझ, हजरतबल आणि जदीबल या तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या आहेत.