Jammu-Kashmir Election :जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी 2001 च्या संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरुच्या फाशीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अफझल गुरुला फाशी देण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारची परवानगी आवश्यक असती, तर आम्ही परवानगी दिली नसती, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फोडले आहे.
आमचा फाशीशी संबंध नाहीएएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, "अफझल गुरुला फाशी देण्यात जम्मू-काश्मीर सरकारची कोणतीही भूमिका नाही. अफझलला फाशी देऊन कोणताही हेतू साध्य झालेला नाही. अफझल गुरुच्या फाशीसाठी जम्मू-काश्मीर सरकारची परवानगी आवश्यक असती, तर आम्ही परवानगी दिली नसती."
"आम्ही फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आहोत. न्यायालयांच्या अयोग्यतेवर आमचा विश्वास नाही. भारतात नाही, पण इतर देशांमध्ये जिथे-जिथे लोकांना फाशी दिली गेली, ते निर्णय नंतर चुकीचे ठरले," असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते साजिद युसूफ म्हणाले की, "अफजल गुरुला फाशी देणे हे जम्मू-काश्मीरमधील लोकांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे."
अब्दुल्लांच्या वक्तव्यापासून काँग्रेस दूर
दुसरीकडे, नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती करुन जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस पक्षाने अब्दुल्ला यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी या मुद्द्यावर कोणतीही भूमिका घेण्यास नकार दिला आणि म्हणाले, “आम्ही या गोष्टीची चर्चा का करत आहोत? ही निवडणूक वेळ आहे. लोक निवेदने देतात, यावर मी भाष्य करू इच्छित नाही.” विशेष म्हणजे, अफजल गुरुचा भाऊ एजाज अहमद गुरू याने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे अफझल गुरुचा विषय निघाला आहे.