श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. कुलगाम चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले आहे. जिल्ह्यातील रेडवानी गावातील एका घरामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर भारतीय लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफनं संयुक्तरित्या ऑपरेशन राबवत परिसरात शोधमोहीम सुरू केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच तासांमध्ये चकमकीदरम्यान जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यादरम्यान, एक जवान शहीद झाला आहे.
(Jammu Kashmir : ऑपरेशन ऑलआऊट! 72 तासांत 16 दहशतवाद्यांचा खात्मा)
याव्यतिरिक्त, पुलवामामधील त्रास परिसरातही दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. हाफू गावात एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्याचा शोध सुरू आहे.
काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा
दरम्यान, दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात शनिवारी (24 नोव्हेंबर) मध्यरात्री सुरू होऊन रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिलेल्या सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. संशयित दहशतवादी म्हणून मारल्या गेलेल्या सहांपैकी पाच जण स्थानिक युवक होते. सहावा पाकिस्तानी नागरिक असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लगोलग करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.