श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा शहरातील राजपोरामध्ये सुरक्षा दलांसोबत दहशतवाद्यांची चकमक झाली. या चकमकीत भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून दोन AK-47 रायफल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. शाहिद राथेर(रा.त्राल) आणि उमर युसूफ(रा.शोपियान) अशी मृत दहशतवाद्यांची नावे आहेत.
एएनआयशी बोलताना काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, दहशतवादी गुन्ह्याव्यतिरिक्त, शकीला नावाच्या महिलेची हत्या आणि सरकारी कर्मचारी जाविद अहमद यांच्या हत्येत शाहिदचा हात होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय सुरक्षा दल शोध मोहीम राबवत असताना लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू झाली.
या भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. यात दोन दहशतवादी ठार झाले. दरम्यान, रविवारीदेखील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणाहून दोन AK-47 रायफल आणि गुन्ह्यात वापरलेली इतर सामग्री जप्त केली आहे.