Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी(दि.6) भीषण चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन जवान शहीद झाले, तर आतापर्यंत सहा ते आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. कुलगाम जिल्ह्यातील मोदरगाम आणि चिनिगाम गावात ही चकमक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली चकमक मोदरगाम गावात झाली. या चकमकीत पॅरा कमांडो लान्स नाईक प्रदीप कुमार शहीद झाले, तर दोन ते तीन दहशतवादी ठार झाले. तर, दुसरी चकमक फ्रिसल चिनिगाम गावात झाली. या चकमकीत अकोल्यातील रहिवासी आणि राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार प्रदीप जंजाळ शहीद झाले, तर लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. अजून तीन दहशतवादी मोदरगाम येथील एका बागेत आणि एक दहशतवादी चिनीगाम फ्रिसालमध्ये लपल्याची माहिती आहे. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने या परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे.
कुलगाम बनले दहशतवाद्यांचे आश्रयस्थान?जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये याआधीही चकमकीची प्रकरणे समोर आली आहेत. अलीकडेच 6 मे रोजी कुलगामच्या रेडवानी पाइन भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यापूर्वी 4 मे रोजी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात भारतीय वायुसेनेचा एक जवान शहीद झाला, तर 4 जण जखमी झाले होते.