श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. ठार झालेले दोन्ही दहशतवादी स्थानिक असून ते लष्कर-ए-तोयबा/टीआरएफ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले दोन्ही दहशतवादी अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते.
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, ठार झालेले दोन्ही दहशतवादी स्थानिक रहिवासी असून ते लष्कर-ए-तोयबासी संबंधित होते. याआधीही ते अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीर झोन पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या घटनेची माहिती दिली आहे.
लष्करचा म्होरक्या ठार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10 वाजता कुलगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली, ज्यामध्ये आधी एक दहशतवादी मारला गेला, त्यानंतर दुसरा दहशतवादीही ठार झाला. सध्या सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या शोध मोहिमेत खोऱ्यात जवळपास दररोज दहशतवाद्यांशी चकमक होत आहे. कालही येथे सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. सुरक्षा दलांनी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि अन्य एकाला चकमकीत ठार केले.
काल ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव सलीम पर्रे आहे. तो पाकिस्तानचा रहिवासी होता. 2016 मध्ये सुमारे 12 नागरिकांच्या मृत्यूसाठी सलीम पारे जबाबदार असल्याचे मानले जात होते. सलीम पर्रेचा अनेक दिवसांपासून शोध सुरू होता. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या भागात अजूनही चकमक सुरू आहे.