श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (5 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये त्राल परिसरात मंगळवारी पहाटे चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
Jammu And Kashmir : हंदवाडा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान रविवारी (3 मार्च) दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. मात्र, दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले होते. या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचारी शहीद झाले आहेत. तर नऊ जवान जखमी झाले असून यामध्ये दोन सीआरपीएफचे जवान आहेत आणि सात लष्कराचे जवान आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. तब्बल 48 वर्षांनी भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून ही कारवाई केली. या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान भेदरला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. 48 वर्षांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हवाई दलाच्या जवानांनी ओलांडली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी 1971 साली अशी कारवाई केली होती आणि त्यातूनच बांगलादेश स्वतंत्र झाला होता.