Jammu-Kashmir:जम्मू-काश्मीरच्या अरनिया सेक्टरमध्ये गुरुवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. हा गोळीबार आज पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होता. अशा कठीण परिस्थितीत सीमावर्ती बुल्लेचक गावातील लोकांना जीव वाचवण्यासाठी घरे सोडून पळ काढावा लागला. यावेळी गावातील लोकांना बंकरमध्ये लपावे लागले.
गावातील एकता नावाच्या महिलेने ANI ला सांगितले की, 'सुरुवातीला सौम्य गोळीबार सुरू होता, पण रात्री 8 वाजता अचानक एक मोठा मोर्टार शेल आमच्या घरावर पडला. यामुळे किचनचे मोठे नुकसान झाले, सर्व घराच्या खिडक्यांही फुटल्या.' गावचे सरपंच देवराज चौधरी यांनी सांगितले की, एकता आणि तिच्या कुटुंबाने गोळीबाराच्या वेळी घरातच रात्र काढली, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
गोळीबार कमी झाल्यानंतर गावातील लोकांनी बंकरचा वापर केला. संपूर्णरात्र गावातील नागरिक सैन्याने बांधलेल्या बंकरमध्ये लपले होते. या बंकरनेच या लोकांचा जीव वाचवला. या बंकरवर गोळीबार किंवा बॉम्ब हल्ल्याचाही परिणाम होत नाही. एका व्यक्तीने सांगितले की, 'हे बंकर खूप मोठे आहेत, त्यामुळे जेव्हा-जेव्हा गोळीबार सुरू होतो, तेव्हा आम्ही या बंकरमध्ये लपतोत. हे बंकरच आमचा जीव वाचवतात.'