जम्मू : जम्मू-काश्मीर सरकारने नवव्या शतकातील प्रसिद्ध काश्मिरी अभियंते सूय भट्ट यांच्या नावाने वीज बचतीची एक योजना रविवारी सादर केली. विविध श्रेणींतील ग्राहकांना एलईडीच्या वापराला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री द्राबू म्हणाले की, प्राचीन काळातील अभियंते सूय भट्ट यांच्या नावाने एक योजना सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे ग्राहकांमध्ये विजेच्या वापराबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. काश्मिरी पंडितांची संस्कृती व त्यांची परंपरा याची अनुभूती देता यावी यासाठी सरकारने लोकजीवन व संस्कृतीला अभिव्यक्त करणाऱ्या आदर्श गावांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सर्वात आधीचे काश्मिरी पंडित जेथे राहत होते तेथेच पहिले सांस्कृतिक गाव उभे राहणार आहे. काश्मिरी पंडितांची परंपरा आणि संस्कृतीशी संबंधित मुद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे गाव पुन्हा उभारण्यात येणार आहे, असे द्राबू म्हणाले.४सूय भट्ट यांनी नवव्या शतकात झेलम नदीतील गाळ आणि दगड बाहेर काढून नदीचा प्रवाह आशियातील सर्वात मोठे सरोवर असलेल्या वूलरकडे वळविला होता. ४सोपोरचे (सूयपूर) नाव त्यांच्याच नावावरून पडले आहे. त्यांनी श्रीनगरजवळ अवंतीपूर नामक शहर वसवले होते. त्याचे अवशेष आजही उपलब्ध आहेत.
वीज बचतीबाबत जागृतीसाठी जम्मू-काश्मीर सरकारचा पुढाकार
By admin | Published: March 23, 2015 11:47 PM