लखनऊ: जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अतिशय सामान्य आहे. या भागात गेल्या काही दिवसांमध्ये कोणतंही हत्याकांड घडलेलं नाही, असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. काश्मीरमध्ये सारं काही आलबेल असल्याचं सांगताना त्यांनी तिथल्या परिस्थितीशी तुलना पाटण्याशी केली. पाटण्यात जितके खून दिवसभरात होतात, तितके मृत्यू काश्मीरमध्ये एका आठवड्यात होतात, असा अजब दावा मलिक यांनी केला. या दाव्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाला सत्यपाल मलिक उपस्थित होते. त्यावेळी जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अतिशय सर्वसामान्य असल्याचं मलिक यांनी सांगितलं. 'जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती देशातील इतर राज्यांसारखीच आहे. तिथं कोणतंही हत्याकांड झालेलं नाही. जितक्या हत्या पाटण्यात दिवसभरात होतात, तितके मृत्यू काश्मीरमध्ये आठवड्यात होतात. काश्मीरमध्ये आता दगडफेकीच्या घटना घडत नाहीत. दहशतवादी संघटनांमधील भरतीदेखील थांबली आहे,' असं मलिक म्हणाले.
पाटण्याच्या तुलतेन काश्मीर सुरक्षितच; राज्यपालांकडून अजब तुलना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 5:46 PM