श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (5 ऑक्टोबर) अनंतनाग येथील डीसी ऑफिस बाहेर सुरक्षा दलावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या ग्रेनेड हल्ल्यात 10 जण जखमी झाले आहेत. जवानांनी या परिसराला घेराव घातला असून परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनागमध्ये उपायुक्त कार्यालयाबाहेर शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. यामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. कार्यालयाबाहेर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांवर हा हल्ला करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवल्यापासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना गती देण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र सीमेवर सतर्क असलेले भारतीय लष्कराचे जवान पाकिस्तानकडून होणाऱ्या अशा कारवाया हाणून पाडत आहेत. दरम्यान, पाकिस्तानी घुसखोरांच्या घुसखोरीचा अजून एक व्हिडीओ समोर आला असून, 12 आणि 13 सप्टेंबरदरम्यानच्या या व्हिडीओत पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरीच प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मात्र भारताच्या जवानांनी ग्रेनेड हल्ला करून पाकिस्तानी बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.