जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील गुगलधर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईत लष्कराने दहशतवाद्यांकडून शस्त्र आणि युद्धाशी संबंधित इतर साहित्य जप्त केलं आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, परिसरात सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे.
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती शेअर देण्यात आली आहे. सुरक्षा दलांना गुगलधर भागात दहशतवादी घुसखोरी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. यावेळी सुरक्षा दलांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला. यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू झाला, ज्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
जप्त केलेली शस्त्रास्त्रं आणि इतर सामग्रीवरून हे स्पष्ट झाले आहं की, दहशतवादी मोठा कट रचत होते. या भागात अजूनही सुरक्षा दलांचा बंदोबस्त आहे. तेथे आणखी कोणी दहशतवादी लपून बसले नसल्याची खात्री करण्यासाठी परिसराचा कसून शोध सुरू आहे. ही चकमक दहशतवादाच्या विरोधात सुरक्षा दलांकडून चालवल्या जात असलेल्या मोहिमेचा एक भाग आहे, ज्यामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी सतत ऑपरेशन केले जात आहेत.
४ ऑक्टोबर २०२४ रोजी कुपवाडाच्या गुगलधरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्न केला जात असल्याच्या माहितीवरून भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. यावेळी सुरक्षा दलाला संशयास्पद हालचाली आढळून आल्या. काही वेळाने दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. लष्कराच्या सतर्कतेमुळे घुसखोरीचा प्रयत्न फसला. सध्या कारवाई सुरू असून सर्च ऑपरेशन सुरू आहे.