श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (3 जानेवारी) जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. पुलवामातील त्राल परिसरात ही चकमक सुरू होती. जवान आणि दहशतवादी दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू होता. या चकमकीदरम्यान, तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. ठार करण्यात आलेले हे दहशतवादी 'जैश-ए-मोहम्मद' संघटनेतील असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू झाले आहे. या चकमकीत तीन जवानदेखील जखमी झाले आहे. परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली.
शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरा दाखल जवानांनी गोळीबार करत दहशतवाद्यांना चोख उत्तर दिलं आणि तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका जवानाची प्रकृती गंभीर आहे.
(LOC वर पाकिस्तानचा हल्ला लष्कराने पाडला हाणून, BAT च्या दोन कमांडोंना कंठस्नान)
(लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटला मोठे यश! 2018 मध्ये तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान)
दरम्यान, काश्मीर खोऱ्यात उच्छाद घालणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लष्कराने सुरू केलेल्या ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेला मोठे यश मिळाले. 2018मध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकींमध्ये लष्कराने तब्बल 311 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.