ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 10 - पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये शनिवारी (10 जून) दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी त्यांचा घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. शिवाय, एका दहशतवाद्याचा खात्माही करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून दहशतवाद्यांकडील शस्त्रंही हस्तगत करण्यात आली आहेत. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
दरम्यान, शुक्रवारी (9 जून) काश्मीरच्या उरी भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या सहा दहशतवाद्यांना सैन्याने ठार केले. गत तीन दिवसांत घुसखोरीचा हा तिसरा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असून, यात एकूण 13 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे दहशतवादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर सैन्याने गुरुवारीच उरी भागात विशेष मोहीम चालविली होती. या चकमकीत सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करून दहशतवादी पाठवण्याचे पाकिस्तानचे अनेक प्रयत्न गत 24 तासांत हाणून पाडण्यात आले आहेत. कुपवाडाच्या माछिल आणि नौगाम सेक्टरमध्ये तसेच बांदीपोराच्या गुरेज भागात ही घुसखोरी झाली.
दरम्यान, युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी शुक्रवारी बंदचे आवाहन केल्यावर प्रशासनाने नागरिकांच्या हालचालींवर बंधने घातली. काश्मीरच्या अनेक भागांत दैनंदिन जीवन विकळीत झाले. संपूर्ण खोऱ्यात शाळा आणि महाविद्यालये व अनेक भागांत दुकाने, कार्यालये तसेच व्यापारी केंद्रे बंद होती.
शोपियान व श्रीनगरमधील काही भागांत प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांच्या येण्याजाण्यावर निर्बंध घातले. राष्ट्रीय तपास संस्थेने खोऱ्यात घातलेले छापे आणि सुरक्षादले व नागरिकांत मंगळवारी गनपोरा शोपियान येथे चकमकीत आदिल फारूक (१९) मारला गेल्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर ही बंधने होती.
#FLASH: Infiltration bid foiled in J&K"s Gurez Sector. One terrorist gunned down; one weapon recovered. Operation underway. pic.twitter.com/lqm2IELGUw— ANI (@ANI_news) June 10, 2017