श्रीनगर - काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे सर्वेसर्वा फारुख अब्दुल्ला यांना दे धक्का करत हिलाल राथर सज्जाद हे लोन पिपुल्स कॉन्फ्रेन्समध्ये सहभागी झाले आहेत. हिलाल राथर हे माजी अर्थमंत्री अब्दुल रहीम राथर यांचे सुपुत्र आहेत. हिलाल यांची कारकिर्दी चांगलीच वादग्रस्त राहिली आहे, कोट्यवधी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात आणि हवाला प्रकरणात त्यांचे नाव आले होते.
पिपुल्स कॉन्फरेन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांनी श्रीनगर येथील आपल्या निवासस्थानी हिलाल राथर यांचे स्वागत केले. जम्मू काश्मीरमधील राजकीय वर्तुळात ही मोठी घटना मानली जात आहे. राथर कुटुंबीय हे गेल्या दशकभरापासून नॅशनल कॉन्फ्रेन्सचे खंबीर साथीदार राहिले आहेत. त्यामुळेच, हिलाल यांच्या पक्षप्रवेशाने जम्मू काश्मीरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, असे सज्जाद लोन यांनी स्वागतपर भाषणात म्हटले.
2020 मध्ये अटकेत होते हिलाल राथर
हिलाला राथर यांना भ्रष्टाचार निरोधक ब्युरो (एसीबी) ने 17 जानेवारी 2020 रोजी अटक केली होती. जम्मू काश्मीर बँकेद्वारे स्वीकृत टर्म लोनद्वारे कोट्यवधी रुपयांच्या हेराफेरीमध्ये सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर, सीबीआयने हे प्रकरण आपल्या हाती घेतले आहे.
दरम्यान, काही नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सला काही फरक पडणार नाही. लोक येतात आणि जातात पण पक्ष सर्वच संकटाला तोंड देत कायम उभा असतो, असे एनसीचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी म्हटलंय.