जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू असतानाच मंगळवारी (11 जून 2024) सायंकाळच्या सुमारास कठुआ जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला आहे. दरम्यान कठुआतील हिरानगरमधील सोहल भागातील सैदा गावात लपलेल्या एका संशयित पाकिस्तानी दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले.
खात्मा केलेल्या दहशतवाद्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि एक लाख रुपये मिळाले आहेत. या दहशतवाद्याकडून सुरक्षा दलाने 3 मॅगझिन, 75 राउंडची पॉलिथीन बॅग, 3 ग्रेनेड, पाकिस्तानमध्ये बनवलेले चॉकलेट, हरभरे, पोळ्या, पाकिस्तानात बनवलेली औषधी, पेन किलर इंजेक्शन, 1 सिरिंज, ए4 बॅटरी आणि 1 हँडसेट जप्त करण्यात आला आहे.
यानंतर, संरक्षण दलाच्या जवानांनी नाकाबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे. लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून घुसखोरी केल्याचे समजते. महत्वाचे म्हणजे, गेल्या तीन दिवसांत जम्मू आणि काश्मीरात तीन दहशतवादी हल्ले झाले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर गोळीबार -जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये मंगळवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनीसुद्धा प्रत्युत्तर दिले. गोळीबारात दोन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चतरगला भागात ४ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चौकीवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. यानंतर याठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू झाली.