श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील पिचनाड माछिल परिसरात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच, काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पठाणकोट ते जम्मूपर्यंत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. याशिवाय परिसरातील सर्व आर्मी स्कूल बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी पठाणकोटला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवर 3 संशयित दिसले होते. बीएसएफने या संशयितांना रोखले असता गोळीबार करत ते पळून गेले. दरम्यान, 5 मे रोजी किंवा त्यापूर्वी दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
गुप्तचर संस्थेच्या अहवालानुसार, दहशतवादी पुलवामा हल्ल्याप्रमाणे सुरक्षा दलाच्या ताफ्याला किंवा त्यांच्या संस्थांना लक्ष्य करण्याचा विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर पठाणकोट ते जम्मूपर्यंत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. येथील आर्मी कॅन्टच्या आत असलेले स्कूल खबरदारीचा उपाय म्हणून एक दिवसासाठी बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, संपूर्ण जम्मू भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महामार्गावर पोलीस, एसओजी आर्मी आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.