नवी दिल्लीः स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक दिवस आहे. देशाचं स्वर्ग समजले जाणारे जम्मू-काश्मीर आणि लडाख हे आजपासून केंद्रशासित प्रदेश बनले आहेत. भारतानं 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटवल्यानंतर 31 ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन वेगवेगळी केंद्रशासित राज्यं अस्तित्वात आली आहेत. अशातच या दोन्ही राज्यांत संसदेनं तयार केलेले अनेक कायदे लागू होण्याची शक्यता आहे. याअंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा राहणार असून, लडाख हा केंद्रशासित प्रदेश असेल. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 144वी जयंती असून, त्यांनी जम्मू-काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. केंद्रानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ताक्षरात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश घोषित करणाऱ्या राजपत्र(गॅझेट) जारी केलं आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनला असून, त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. राज्यात पुनर्रचनेची अंमलबजावणीची तारीख 31 ऑक्टोबर ठेवली असून, तो देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांचा जयंती दिन आहे.
मध्यरात्रीत जन्मले दोन केंद्रशासित प्रदेश; जम्मू-काश्मीर अन् लडाख आले अस्तित्वात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 8:49 AM