श्रीनगर, दि. 4 - जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सोमवारी (4 सप्टेंबर) सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना सोपोर परिसरात दहशवादी घुसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीमेस सुरुवात केली. यादरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. दरम्यान, खात्मा करण्यात आलेले दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाचे असल्याची माहिती समोर आली आहे. सोपोरमधील शानगेरगुंड भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली. या भागात अद्याप एन्काऊंटर सुरुच असून लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर यासीन इटूचा एन्काऊंटर
12 ऑगस्ट - दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन या दहशवादी संघटनेचा कमांडर यासीन इटू उर्फ गजनवीचा जवानांनी खात्मा करण्यात आला आहे. यासीन इटूचा खात्मा म्हणजे दहशतवादी संघटनांना मोठा झटका असल्याचे म्हटले गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन इटू हा मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील राहणार होता. बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खो-यात उफाळून आलेला हिंसाचार, अशांती कायम राखण्यासाठी त्याचा मुख्यतः समावेश होता. भारतीय सैन्याने जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत यासीन इटूचा A प्लस यादीतही समावेश होता. यासीन इटू हा बुरहान वाणीचा जवळचा मानला जायचा. त्यामुळे यासीन इटूचा खात्मा भारतीय जवानांसाठी मोठं यश मानले जाते आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार
4 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी ठार मारला गेला. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला. एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले. यानंतर एन्काऊंटरमध्ये एका बाईकस्वाराला ठार करण्यात आले. ठार करण्यात आलेला व्यक्ती हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता, असे पोलिसांनी सांगितले. या दहशतवाद्याकडून रायफल, चिनी हॅण्ड ग्रेनेडसहीत अन्य दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत 3 राष्ट्रीय रायफल्सचे एक जवान जखमी झाला आहे. दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद3 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील शोपियान व कुलगाम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचं नाव आकिब असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर शोपियानमध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यात एक मेजर व दोन जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीननं शोपियान हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. यात अल्ताफ खुचरू सामिल होता, असे वृत्त समोर आले आहे. तो टॉप हिजबुल कमांडर असल्याचे बोलले जात आहे.
लष्कर-ए-तोयबाच्या अबू दुजानाचा खात्मा1 ऑगस्ट रोजी भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबू दुजाना आणि त्याचा साथीदार आरिफचा एन्काऊंटर केला. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जातात.