ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 5 - जम्मू काश्मीरमध्ये खेळल्या गेलेल्या स्थानिक क्रिकेट सामन्याआधी खेळाडूंनी हिरव्या रंगाची जर्सी घालत पाकिस्तानी राष्ट्रगीत गायल्याचं समोर आलं आहे. यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सत्यता तपासली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ काश्मीरच्या गांदबरल जिल्ह्यातील आहे. हा व्हिडीओ 2 एप्रिलचा असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजे ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चेनानी-नाशिर या सर्वात मोठ्या बोगद्याच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते त्यादिवशीच हा सामना झाला. फुटीवरतावाद्यांनी त्यादिवशी खो-यात बंद पुकारला होता.
बाबा दरयाउद्दीन असं या संघाचं नाव होतं. त्यांनी सामन्यादरम्यान पाकिस्तानचा पारंपारिक रंग हिरव्या रंगाची जर्सी घातली होती. विरोधी संघ सफेद रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. सामना सुरु होण्याआधी "सन्मानाच्या हेतूने पाकिस्तानी राष्ट्रगीत वाजवलं जाईल" अशी घोषणा लाऊडस्पीकरवरुन करण्यात आली. "आपण वेगळं दिसावं असं आमच्या संघाला वाटत होतं. सोबतच आम्ही काश्मीरचा मुद्दा विसरलेलो नाही याची जाणीव काश्मिरी लोकांना करुन द्यायची होती. यासाठी ही थीम आम्ही निवडली", असं टीमच्या एका सदस्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीखाली सांगितलं आहे.
काश्मीरमध्ये अशा प्रकारच्या घटना होणं किंवा दिसणं यामध्ये नवीन असं काही नाही. येथे पाकिस्तान आणि इसीसचे झेंडे फडकवले जात असतात. गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा जवानांवर तरुणांकडून दगडफेक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती ज्यानुसार एका क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये क्रिकेट संघांना दहशतवाद्यांची नावे देण्यात आली होती.