श्रीनगर - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानात कार घुसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला सुरक्षा रक्षकांनी ठार केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेल्या व्यक्तीनं अब्दुल्ला यांच्या निवासस्थान परिसरात लावलेले बॅरिकेट तोडून कार घुसवली. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण कारचालकानं त्यांचं काहीही ऐकलं नाही. अखेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी कारचालकावर गोळीबार केला. या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या युवकाच्या नातेवाईकांनी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोंधळ घातला आहे.
(JKCA Scam: फारुक अब्दुल्ला यांच्याविरोधात सीबीआयचे आरोपपत्र )
मुराद अली शाह असे ठार करण्यात आलेल्या युवकाचं नाव असून तो पूंछमधील मेंढर परिसरातील रहिवासी होता, अशी माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईचा तीव्र विरोध दर्शवत युवकाच्या वडिलांनी म्हटले की, माझा मुलगा काल रात्री माझ्यासोबत होता. नेहमीप्रमाणे आजदेखील तो जिममध्ये जाण्या साठी घराबाहेर पडला. जर त्यानं गेट तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस सुरक्षा रक्षक कोठे होते?, त्याला त्यावेळेसच अटक का केली गेली नाही?, माझ्या मुलाला ठार का मारण्यात आलं?, याचं उत्तर मला हवंय. तर दुसरीकडे, या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी चारही बाजूंनी परिसराला घेराव घातला असून फारूख यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ केली आहे. पोलीस आणि सीआरपीएफ घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
दहशतवादी हल्ल्याचा धोका पाहता फारुख अब्दुल्ला यांना झेड प्लस प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या घटनेनंतर फारूख अब्दुल्ला यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली की, एका व्यक्तीनं आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मुख्य दरवाजातून प्रवेश करत हा घुसखोर लॉबीपर्यंत पोहोचला होता. दरम्यान, तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना ठार केलं असून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.