नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांकडून चनापोरा भागात तैनात असलेल्या जवानांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर परिसरात जवानांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी चनापोरा येथील CRPF BN 29 वर ग्रेनेड फेकला. परिसराला घेराव घालण्यात आला असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील चनापोरा पोलीस स्टेशनच्या बाहेर सुरक्षा दलाच्या ब्लॉकवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक सीआरपीएफ जवान जखमी झाला आहे. तसेच एक महिला देखील जखमी झाली. जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPF च्या संयुक्त टीमने परिसराला घेराव घातला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी अनंतनाग जिल्ह्यातील शेरबाग येथील एका पोलीस चौकीवरही दहशतवाद्यांनी ग्रेनेडनं हल्ला केला होता. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येण्यात आयएसआयचा मोलाचा वाटा आहे. आयएसआयच्या मदतीमुळेच तालिबानला अफगाणिस्तान काबीज करता आला. त्यानंतर आता आयएसआयनं लष्कर-ए-तोएबा, जेईएम आणि अल-बद्रच्या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे.
भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानचा मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये 200 दहशतवादी घातपाताच्या तयारीत
गेल्या दोन महिन्यांपासून दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले जात आहेत. सध्याच्या घडीला जम्मू-काश्मीरात जवळपास 200 दहशतवादी सक्रीय आहेत. यामध्ये परदेशी आणि स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. आयएसआयकडून आदेश मिळताच ते घातपात घडवू शकतात. आयएसआयचे मनसुबे पाहता भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. भारतीय सुरक्षा दलानं सीमा ग्रीड आणखी मजबूत केलं आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील बंदोबस्त वाढवला आहे. सीमेपलीकडून घुसखोरी करणारे दहशतवादी सीमावर्ती गावांमध्ये आश्रय घेतात. त्यांना सहजासहजी आश्रय मिळू नये यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत.