श्रीनगर: मागील अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात ऑपरेशन सुरू आहे. राजौरी आणि पुंछमध्ये लष्करासोबत सुरू असलेल्या चकमकीचा आज 12वा दिवस आहे. दरम्यान, राज्यातील बिगर स्थानिकांच्या हत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज अनंतनागमधील जंगलमुंड येथील बिलाल कॉलनी परिसरात एका गैर-स्थानिक नागरिकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे.
मृतदेहाबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाच्या डोक्यात जखमा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तूर्तास कोणत्याही प्रकारची गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
जंगलात न जाण्याचा इशाराजम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने सुरू केलेल्या दहशतवादविरोधी कारवायांमुळे संतापलेले दहशतवादी एकामागून एक गैर-काश्मीरींना लक्ष्य करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी पुंछमधील बथुरियन भागातील मशिदींमधील पब्लिक अॅड्रेस सिस्टीमद्वारे(भोंगा/लाउड स्पीकर) लोकांना जंगलाकडे न जाण्याचे आवाहन केले आहे.
बुधवारी 4 दहशतवादी ठार
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दोन कमांडर आणि चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. नुकत्याच झालेल्या स्थलांतरित मजुरांच्या हत्येत या दहशतवाद्यांचा हात होता. शोपियानमधील दरगड येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, तर कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.