श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या हाती मोठे यश लागले आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीन(HM) च्या A+ श्रेणीतील एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश आले आहे.
2018 मध्ये शोपियानच्या झैनपोरा येथे अल्पसंख्याक गृहनिर्माण शिबिराचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवर झालेल्या हल्ल्यासह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्या हल्ल्यात चार पोलिस शहीद झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14/15 डिसेंबरच्या मध्यरात्री पुलवामाच्या उजरामपथरी गावात दहशतवादी असल्याच्या एका विशिष्ट माहितीवर कारवाई करण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कराच्या 44 आरआर आणि सीआरपीएफच्या 182 बटालियनने संयुक्त ऑपरेशन करुन परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.
शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्याची उपस्थिती लक्षात येताच, त्याला आत्मसमर्पण करण्याची वारंवार संधी देण्यात आली. पण, त्याने संयुक्त शोध पधकावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा दहशतवादी मारला गेला असून त्याचा मृतदेह चकमकीच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे. फिरोज अहमद दार असे त्याचे नाव असून तो हेफ-श्रीमल शोपियांचा रहिवासी आहे.
फिरोज दारचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग
पोलिसांनी सांगितल्यानुसार, ठार झालेला दहशतवादी A+ श्रेणीचा होता. तो सुरक्षा दल आणि नागरी अत्याचारांसह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गटांचा भाग होता. तो 2017 पासून सक्रिय होता आणि डिसेंबर 2018 मध्ये झैनपोरा येथे अल्पसंख्याक रक्षकावर झालेल्या हल्ल्यासह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता.
फिरोजकडून दारुगोळा जप्त फिरोज मूळ पंजाबचा रहिवासी असलेल्या बिगर स्थानिक मजूर हंस राजचा मुलगा चरणजीत याच्या हत्येतही सामील होता. ऑक्टोबर 2019 मध्ये शोपियानच्या जैनपोरा भागात एका वाहनात सफरचंदाचे बॉक्स भरत असताना झालेल्या घटनांमध्ये त्याने इतर लोकांनाही जखमी केले होते. याशिवाय तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी प्रलोभन देण्यातही त्याचा हात होता. त्याच्याकडून गुन्ह्यातील साहित्य, शस्त्रास्त्रे, तीन मॅगझिनसह एक एके रायफलही जप्त करण्यात आली आहे.