श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून दहशतवादी-राजकीय संबंध आणि दहशतवादी फंडिंगचे नेटवर्क उद्धवस्त करण्यात गुंतलेल्या सुरक्षा दलांच्या हाती मोठे यश आले आहे. आज हरवान भागात दहशतवाद्यांशी चकमक झाली, याचकमकीत एका अज्ञात दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील हरवाना भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची बातमी समोर आली, ज्यामध्ये सुरक्षा दलांनी एक दहशतवाद्याला ठार केले आहे. अद्याप त्या दहशतवाद्याचे नाव किंवा ओळख याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, ठार झालेला दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वी कुलगाममध्ये चकमक
यापूर्वीही जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत, ज्यांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी बुधवारी रात्री कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. त्यांनी सांगितले की, यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्यावर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. पहाटे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.